सर्वोच्च न्यायालय धनुष्यबाण आपल्याला देईल नाहीतर चिन्ह गोठवेल : उद्धव ठाकरे

Foto
मुंबई : गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसंबंधी उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्षचिन्ह आपल्यालाच देणार, आणि जरी चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून 2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यावेळी पक्षाच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हाच्या लढाईत आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केल्याची माहिती आहे.

2029 च्या निवडणुकीच्या तयारीला लागा
आपल्याला चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्याही दिल्या. जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावे, अशा पदाधिकाऱ्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाल्याची माहिती आहे.

सध्याचा काळ हा पक्षवाढीसाठी अनुकूल असून पदाधिकाऱ्यांनी 2029 सालच्या लोकसभा-विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. पक्षबांधणीवर भर देऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडण्याच्या सूचना ठाकरेंनी दिल्या. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले.

SIR वर लक्ष ठेवा, ठाकरेंच्या सूचना
दरम्यान, 8 ऑगस्टपर्यंत SIR नोंदणी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात याव्यात. त्यासाठी आपापल्या विभागात आणि जिल्ह्यात नागरिकांची नोंदणी पूर्ण करण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. एसआयआर प्रक्रियेतून एकाही पात्र व्यक्तीचे नाव वगळले जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना उद्धव ठाकरेंनी दिल्या. 

नीटचा पेपर फुटला म्हणून ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांची सरकारने माफी मागितली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांवर ही वेळ आली, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला, त्यांचीही सरकारने माफी मागितली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

चार वर्षांपासून सुनावणी
शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे.